शिंदखेडा गटसाधन केंद्राच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

बोधकथा

स्‍वावलंबन

एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला.
खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.''
तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

सवय

एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते
दार उघडे टाकून निघून गेला असता
पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व
मरून गेला.
तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------

वक्ता आणि श्रोते

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही
त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच
तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.
तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो
----------------------------------------------------------------------------------------------------------------

एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ


एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.


तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते.  
------------------------------------------------------------------------------------------------

खरा वेडा कोण 


एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''  
---------------------------------------------------------------------------------------------------------------

धर्म म्‍हणजे काय


एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्‍ठ धर्माचे महत्‍व समजावून सांगेल त्‍याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्‍वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्‍या धर्माचे महत्‍व समजावून सांगण्‍यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्‍ट आठवणीने करत होते की स्‍वत:च्‍या धर्माचे महत्‍व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्‍या धर्माची निंदानालस्‍ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्‍ठ आहे व त्‍यामुळे तो दु:खी होत होता. पण त्‍याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्‍या दर्शनास गेला. तेथे गेल्‍यावर त्‍याने साधूला नमस्‍कार केला व म्‍हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्‍ठ धर्माच्‍या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्‍ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,''सर्वश्रेष्‍ठ धर्म तर जगात अस्तित्‍वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्‍या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्‍यक्ती निष्‍पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्‍हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्‍यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्‍या. साधू राजाला म्‍हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्‍ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्‍येक नावेपाशी जाताच साधू त्‍या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्‍हटले,''महाराज आपल्‍याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्‍याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्‍हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्‍याला स्‍वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्‍याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्‍यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला